
लातूर, 19 मे (हिं.स.) : नीट पेपरफुट प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता लातूरचे खासदार आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणी खासदारांनी आमदार पवार यांना खुले पत्र लिहित केंद्र सरकार, एनटीए (NTA) आणि परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नीट पेपरफुटीसारख्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषयाला “काँग्रेस विरुद्ध भाजप” अशा राजकीय चष्म्यातून पाहणे दुर्दैवी आहे. “लातूरचा खासदार म्हणून माझी बांधिलकी कोणत्याही व्यक्तीशी नसून प्रामाणिक विद्यार्थ्यांशी आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
ते पुढे म्हणाले की, नीट परीक्षा केंद्र सरकारच्या एनटीए संस्थेमार्फत घेतली जाते आणि गेल्या काही वर्षांपासून देशभरात विविध परीक्षा पेपरफुटीच्या घटनांनी गाजत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये अशा घटना घडल्याचे सांगत त्यांनी परीक्षा प्रक्रियेतील अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
२०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत देशात किमान ६५ पेक्षा अधिक मोठ्या पेपरफुटीच्या घटना नोंदवल्या गेल्याचा दावा करत खासदारांनी हे केंद्र सरकारचे मोठे अपयश असल्याचे म्हटले. या घटनांमुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी नमूद केले.
लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा उल्लेख करताना त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, केशवराज, देशिकेंद्र विद्यालय आणि महात्मा गांधी महाविद्यालय यांसारख्या संस्थांनी ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले असल्याचे सांगितले. “लातूर पॅटर्नला भ्रष्ट व्यवस्थेमुळे डाग लागला आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
“आता चिंतनाची वेळ संपली असून कठोर कृतीची गरज आहे,” असे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीबाबत उत्तर मागितले. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
“प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका व्यक्त करत खासदारांनी शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांबाबत शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही केली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis