
अमरावती, 19 मे (हिं.स.) : “मावशीच्या गावी जातो,” असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुली गूढरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र, बेनोडा पोलिसांनी तत्परतेने शोधमोहीम राबवत तिन्ही मुलींना सुखरूप शोधून त्यांच्या घरी परत आणले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादीच्या मोठ्या भावाच्या दोन मुली (वय १४ व १७ वर्षे) तसेच धाकट्या भावाची एक मुलगी (वय १५ वर्षे) अशा तिघींनी घरातून निघताना आपण वरुड येथे मावशीकडे जात असल्याचे आपल्या आजीला सांगितले होते. मात्र, बराच वेळ उलटल्यानंतरही त्या मावशीकडे पोहोचल्या नाहीत आणि घरीही परतल्या नाहीत.
मुली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळी तसेच वरुड येथील मावशीकडे चौकशी केली. मात्र त्या तेथे पोहोचल्याच नसल्याचे समोर आले. तिन्ही मुलींचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.
मुलींच्या काकांनी दिलेल्या तक्रारीत, “कोणीतरी अज्ञात इसमाने मुलींना आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेले असावे,” असा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार बेनोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम १३७(२) भा.न्या.सं. अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
ठाणेदार विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, तिन्ही मुली नातेवाईकांकडे आढळून आल्या असून पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे. या प्रकरणामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी