वरूडमध्ये तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू
अमरावती, 19 मे (हिं.स.) । वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट ते सातनूर मार्गावरील पुसली धरणात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा प
तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू


अमरावती, 19 मे (हिं.स.) । वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट ते सातनूर मार्गावरील पुसली धरणात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.पंकज संतुलाल उईके (वय १०), प्रिया संतुलाल उईके (वय ८) आणि पवन संतुलाल उईके (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत.

माहितीनुसार, संतुलाल उईके हे सातनूर येथील मनोहर निमकर यांच्या शेतात मागील दोन ते तीन वर्षांपासून मजूर म्हणून काम करत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त त्यांची तिन्ही मुले नरखेड येथील आश्रमशाळेतून घरी आली होती.

रविवार, १७ मे रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास तिन्ही मुले संत्री वेचण्यासाठी शेताकडे गेली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही मुलांचा कोणताही मागमूस लागला नव्हता.

सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजेच्या दरम्यान पुसली धरणाच्या पाण्यावर तिन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. प्राथमिक अंदाजानुसार, मुलांनी कपडे काढून धरणात आंघोळ करण्यासाठी प्रवेश केला असावा. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा अकाली मृत्यू झाल्याने उईके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच शेंदूरजनाघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande