
अमरावती, 19 मे (हिं.स.) : तिवसा तालुक्यातील ममदापूर शेत शिवारात जंगली रानडुकराने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारे 7.30 वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममदापूर येथील अल्पभूधारक शेतकरी दिवाकर प्रल्हादराव टेकाडे (वय 39) हे खरीपपूर्व तयारीसाठी शेतात साफसफाईचे काम करत असताना मागून आलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. रानडुकराने त्यांना जोरदार धडक देत जमिनीवर पाडले आणि काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या हल्ल्यात त्यांच्या छाती आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
त्याच परिसरात दुसरी घटना घडली असून तिवसा येथील महिला मजूर पद्माबाई कोंडे (वय 45) या वणी येथील शेतात कापूस वेचत असताना रानडुकराने त्यांच्यावरही अचानक हल्ला चढवला. या घटनेत त्या देखील जखमी झाल्या आहेत.
दोन्ही जखमींना तात्काळ तिवसा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सलग घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वारंवार होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा तसेच जखमींना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी