
सोलापूर, 19 मे (हिं.स.)। सोलापुरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा निकालानंतर विद्यार्थी आणि पालक करिअर मार्गदर्शन तसेच कलचाचणीसाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. मात्र, याच काळात बोटांच्या ठशांवर आधारित बहुविध बुद्धिमत्ता चाचणी अर्थात ‘डीएमआयटी’च्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे प्रकार वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही चाचणी पूर्णपणे अशास्त्रीय असून विद्यार्थी आणि पालकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञांनी केले आहे.
सामान्यतः करिअर मार्गदर्शन किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने घेतली जाणारी कलचाचणी विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि मानसिक कल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र, काहीजण या शास्त्रीय प्रक्रियेला फाटा देत अंगठ्याच्या ठशांवरून विद्यार्थ्यांचे करिअर ठरवण्याचा दावा करत आहेत. यासाठी पालकांना आकर्षित करून हजारो रुपये खर्च करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे समोर आले आहद .रिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे बोटांचे ठसे घेऊन बहुविध बुद्धिमत्ता चाचणी (डीएमआयटी) केली जाते. त्यानंतर तथाकथित अहवाल तयार करून विद्यार्थ्यांचे भविष्य, क्षमता आणि करिअर पर्याय सांगितले जातात. मात्र, या प्रक्रियेला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे मानसशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि आवडी समजून न घेता केवळ बोटांच्या ठशांवर आधारित अहवाल तयार करणे चुकीचे आहे. अशा चाचण्यांमधून विद्यार्थ्यांना आयुष्यात नेमके काय करायचे याचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे पालकांनी गोड बोलण्याला किंवा आकर्षक जाहिरातींना बळी न पडता अधिकृत आणि शास्त्रीय करिअर समुपदेशनाचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड