
सोलापूर, 19 मे, (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीपासून लाभ न मिळालेल्या महिलांची संख्या राज्यभरात अर्ध्या कोटीवर पोहोचली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे चार लाख महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तीन महिन्यांनंतर दोन महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये वितरित करण्यात आले असले, तरी अनेक महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही.लाभ न मिळालेल्या महिला आता थेट जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. सोमवारी सोलापुरातील कार्यालयात तब्बल १५०० ते २००० महिलांनी गर्दी केली होती.
लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलेच्या नावावर चारचाकी वाहन नसणे आवश्यक आहे. मात्र, अनेक महिलांच्या नावावर वाहन नसतानाही पोर्टलवर वाहनाची नोंद दिसत असल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) चौकशी केली असता, संबंधित महिलेच्या नावावर कोणतेही वाहन नोंद नसल्याचे स्पष्ट होत आहे.याशिवाय, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केल्याची नोंद, चुकीची ई-केवायसी, वयातील तफावत अशी विविध कारणे पोर्टलवर दाखविली जात आहेत.
विशेष म्हणजे, रोजंदारीवर काम करणाऱ्या काही महिलांची नोंद पोर्टलवर आयकरदाते म्हणून झाल्यानेही अनेकांना लाभ मिळालेला नाही.दररोज हजारो महिला रिक्षा किंवा एसटी बसने जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. मात्र, पोर्टल बंद असणे किंवा सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्येमुळे अनेक महिलांना काम न होता परत जावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड