'नीट' आरोपींबाबत संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांना प्रश्न विचारावेत - नवनाथ बन
मुंबई, 19 मे (हिं.स.)। नीट पेपरफुटीप्रकरणी भाजपावर बेताल आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी लातूरमध्ये अटक झालेल्या शिवराज मोटेगावकरबद्दल काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना का प्रश्न विचारला नाही? ‘आम्ही देशमुख यांचे कुंकू लावलेय’ असे जाहीरपणे सांगणारा आण
'नीट'


मुंबई, 19 मे (हिं.स.)। नीट पेपरफुटीप्रकरणी भाजपावर बेताल आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी लातूरमध्ये अटक झालेल्या शिवराज मोटेगावकरबद्दल काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना का प्रश्न विचारला नाही? ‘आम्ही देशमुख यांचे कुंकू लावलेय’ असे जाहीरपणे सांगणारा आणि निवडणूक काळात काँग्रेसचा प्रचार करणारा मोटेगावकर या प्रकरणातील सूत्रधार आहे. त्याच्या अटकेबद्दल बोलताना राऊत यांची दातखिळ का बसली? या मोटेगावकरला पाठीशी कोणी घातले, पेपरफुटीसाठी त्याला कोणी प्रोत्साहन दिले याच्याही चौकशीची मागणी केली पाहिजे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे काम सीबीआय आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्ट करत श्री. बन म्हणाले, तरुणाईसोबत भाजपा आहे. विद्यार्थ्यांचे कुठलेच नुकसान होऊ नये यासाठी नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून फेरपरीक्षा घेण्यात येईल. कुणी कुणाच्याही जवळचे असले तरी त्याला सोडले जाणार नाही. अमित देशमुख यांच्या जवळचे कोण आहेत, काँग्रेसच्या जवळचे कोण आहेत, काही ठिकाणी काँग्रेस आणि नीट पेपरफुटीचे थेट संबंध समोर येत आहेत यावर संजय राऊत यांनी बोलले पाहिजे. राऊतांनी त्याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत आणि नंतर भाजपाला सवाल करावेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लंडनवारीसारखे परदेश दौरे करत नाहीत. ते देशाची रणनीती आखण्यासाठी परदेश दौरे करतात. त्यांच्या दौऱ्यामुळे भारताची रणनीती मजबूत होते आणि जागतिक पातळीवर भारताचे नेतृत्व बळकट होते. ते लंडनमध्ये फोटो काढायला किंवा कुटुंबासोबत वेळ घालवायला जात नाहीत; ते देशाची धोरणे ठरवण्यासाठी जातात. पहलगाममध्ये हल्ला झाला होता तेव्हा उद्धव ठाकरे लंडनमध्ये थंड हवा खात होते, असे श्री. बन यांनी सुनावले.

आतापर्यंत संजय राऊत यांचा देशातील न्यायालयांवर विश्वास नव्हता, सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नव्हता. आता त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयावर आणि अमेरिकेच्या न्यायालयावरही विश्वास नाही. ते म्हणतात की तिथेही मोदी यांनी अदानींना मदत केली. आता त्यांच्याकडे एकच पर्याय उरला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात नव्हे तर अंतराळवीर होऊन अंतराळातील न्यायालयात जावे. कदाचित तिथे तरी त्यांना न्याय मिळेल. एका बाजूला म्हणायचे पंतप्रधान मोदी अमेरिकेचे गुलाम आहेत आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचे की त्यांनी अमेरिकेत जाऊन खटला मॅनेज केला. नेमके खरे काय? ते अमेरिकेचे गुलाम आहेत की अमेरिकेच्या सांगण्यावर खटला मॅनेज केला, हे एकदा स्पष्ट करा आणि एकदा अंतराळातल्या न्यायालयात धाव घ्या. कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या मनासारखा न्याय मिळेल. कारण जनतेने तर तुमची पुरती वाट लावलेली आहे, असे बन यांनी फटकारले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande