पालघर दुर्घटनेतील १२ जणांवर लाखनपाड्यात सामूहिक अंत्यसंस्कार; संपूर्ण गाव शोकसागरात
पालघर, 19 मे (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातानंतर बापूगावातील लाखनपाड्यावर अक्षरशः शोककळा पसरली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रकला कंटेनरची जोरदार धड
palghar accident dead bodies cremation ground dhaniwari bapugaon village


पालघर, 19 मे (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातानंतर बापूगावातील लाखनपाड्यावर अक्षरशः शोककळा पसरली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रकला कंटेनरची जोरदार धडक बसून झालेल्या या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांपैकी १२ जणांवर लाखनपाडा येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी १२ मृतदेह एका रांगेत ठेवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत होती. आपल्या नातेवाईकांना अखेरचा निरोप देताना गावकऱ्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

काल दुपारी चारच्या सुमारास बापूगाव येथून जवळपास 30 ते 40 जण साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी खडकीपाडा येथे निघाले होते. सर्वजण आनंदाच्या वातावरणात लग्न आणि साखरपुड्याच्या गप्पांमध्ये रमले होते. मात्र, नियतीने वेगळाच घात केला. धानिवरी परिसरात महामार्गावरून वळसा टाळण्यासाठी चालकाने आयशर ट्रक पुलाखालून चुकीच्या बाजूने नेला. त्याचवेळी समोरून येणारा कंटेनर दुभाजकावर चढून थेट ट्रकवर कोसळला आणि काही क्षणांत आनंदाचे वातावरण दुःखात बदलले.

या अपघातात ट्रकमधील 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुरेश रत्ना लाखात, पांडू गणपत लाखात, काळू गोविंद लाखात, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुरहाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सिताराम लाखात, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय अहाडी आणि रियांशी संतोष लाखात यांचा समावेश आहे.

अंत्यसंस्कारावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले,आणि आमदार हरिश्चंद्र भोये उपस्थित होते. अपघातातील १७ जखमींवर सध्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या उपचाराची आणि नातेवाईकांच्या राहण्याची संपूर्ण जबाबदारी आदिवासी विकास विभागाने स्वीकारल्याची माहिती अशोक उईके यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande