
परभणी, 02 मे (हिं.स.)। सोनपेठपरिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे, दर्जेदार व सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून डिघोळ परिसरात लवकरच विद्यालय सुरू करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पीठाधीश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र दिनानिमित्त डिघोळ येथे आयोजित श्रीराम शक्तिपीठ संस्थानाच्या चैतन्य हनुमान मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानाचे पीठाधीश्वर, राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज (पंचायती अखाडा श्री निरंजनी) यांच्या प्रमुख उपस्थितीत व आशीर्वादाने शुक्रवार 1 मे रोजी हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी स्वामीजींनी मानवतेचा संदेश देत तरुण पिढीने चांगल्या मार्गावर वाटचाल करावी, व्यसनापासून दूर राहावे, तसेच शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन केले. जातिवाद, भेदाभेद टाळून समाजात एकोपा आणि सद्भावना निर्माण करण्याचेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. याच वेळी डिघोळ परिसरात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा विद्यालयाच्या स्थापनेचा संकल्प त्यांनी जाहीर केला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या सोहळ्यास भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, महंत श्रीनाथानन्द सरस्वती महाराज (श्रीराम शक्तिपीठ संस्थान) महंत सुदर्शनानन्द सरस्वती महाराज, महंत रामानन्द सरस्वती महाराज, महंत विश्वेश्वरानन्द सरस्वती महाराज, महंत शिवानंद सरस्वती महाराज, महंत हंसानंद सरस्वती महाराज, उपसंरपच अजय देशमुख, सुधीर बिंदू,कृष्णा पिंगळे, त्र्यंबकेश्वर येथील बापू पेंडोळे गुरूजी, प्रविण देशमुख गुरूजी, वैजनाथ शिंदे मारुती रंजवे, गणेश मुळे, कुमार चव्हाण, वैभव खंदारे, गोकुळ आरबाड, रविंद्र (महाराज) नन्नवरे, हिरामण ढगे, नाशिक येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानाची मंडळी यासह गोपीनाथ जाधव चव्हाण, अनंता शिंगाडे आदी मोठया संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis