
अकोला, 02 मे (हिं.स.)।
राज्यात १ मे २०२६ पासून डिजिटल जनगणना प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले आहे. जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने प्रत्येक नागरिकाने अचूक व संपूर्ण माहिती नोंदवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या कालावधीत सेल्फ जनगणना ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. नागरिकांना मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरता येणार असून या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत शासकीय अधिकारी व कर्मचारी घराघरात जाऊन माहिती संकलन करणार आहेत. या वेळी नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आमदार पठाण यांनी केले. दरम्यान, स्वतः पुढाकार घेत आमदार साजिद खान पठाण यांनी त्यांच्या निवासस्थानी मोबाईलद्वारे कुटुंबाची जनगणना माहिती नोंदवली. यावेळी चार्ज जनगणना अधिकारी तसेच उत्तर झोनचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल देवकते, फील्ड ट्रेनर नईम फराज, संकेत महागडे आणि अनुग्रह ठाकूर उपस्थित होते.
“जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे माहिती भरून या उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे