
रायगड, 02 मे, (हिं.स.)। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या तयारीला लागले आहेत. जिल्हाभर मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतात सध्या मोठी लगबग सुरू आहे. बांधबंदिस्ती, राब जाळणे, पाला-पाचोळा गोळा करणे, गवत काढणे आणि शेत साफसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्यात भात हे मुख्य पीक असून त्यासोबत फळपिके व भाजीपाला लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. सुवर्णा, जया, कर्जत आणि रत्ना या भाताच्या जातींची लागवड जिल्ह्यात अधिक प्रमाणात होते. जिल्ह्यातील सुमारे ९७ टक्के शेतकरी शेतीसाठी पावसावर अवलंबून असून जवळपास ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पहाटे आणि सायंकाळीच शेतातील कामांना प्राधान्य देत आहेत. काही भागांत अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आधीच पूर्ण केली आहेत, तर काहींनी पेरणीसाठी लागणाऱ्या भात बियाण्यांची तयारी सुरू केली आहे.
“मान्सूनची चाहूल लागली आहे. पाऊस कधीही सुरू होऊ शकतो. त्यामुळे मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. उन्हामुळे दिवसा काम करणे कठीण होत असल्याने पहाटे किंवा सायंकाळीच शेतात काम करावे लागते,” असे शेतकरी हेमदत्त पाटील यांनी सांगितले. पुढील पंधरा दिवसांत बहुतांश मशागतीची कामे पूर्ण होतील, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)