अकोला - महाबीजचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात संपन्न
अकोला, 02 मे, (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. क
Photo


अकोला, 02 मे, (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला.

या ऐतिहासिक सोहळ्यास अकोला पूर्वचे आमदार रणधीरजी सावरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, संचालक मा. वल्लभराव देशमुख व डॉ. रणजित सपकाळ, अकोला महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सुनील लहाने तसेच ‘देशोन्नती’चे संपादक मा. प्रकाशराव पोहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावरील प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे महाबीजचे रोप, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

यानंतर महाबीजच्या गेल्या ५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा सादर करण्यात आला. संस्थेने शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध योजना, उच्च दर्जाचे बियाणे उत्पादन, संशोधन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रसंगी महाबीजच्या नव्या उत्पादनांचे तसेच ‘महाबीज वार्ता’च्या मुखपृष्ठाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच उत्कृष्ट बीज उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट विक्रेते, संशोधित वाणांचे यशस्वी उत्पादन घेणारे शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महाबीजने गेल्या पाच दशकांत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचे प्रतिपादन केले.

मा. आमदार रणधीर सावरकर यांनी महाबीजच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत संस्थेने राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविल्याचे सांगितले. दर्जेदार बियाणे, विश्वासार्ह उत्पादने आणि शाश्वत शेतीसाठी महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती, संशोधनाधारित वाण आणि शेतकऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या धोरणांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी महाबीजच्या योगदानामुळे शेती उत्पादन वाढीस मोठा हातभार लागल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्यातील समन्वयामुळे संशोधनातून विकसित वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा घेताना महाबीज शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभी असल्याचे नमूद केले. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञानावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याची संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाबीजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमास शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande