
लातूर, 02 मे (हिं.स.)। राज्य शासनाकडून उत्कृष्ट व प्रशंसनीय सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, लातूर येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बोंडले यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रमोद बोंडले सध्या लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या सेवाकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे लातूर जिल्ह्यासहनांदेड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोंडले यांचे मूळ गाव घुंगराळा (ता. नायगाव, जि. नांदेड) आहे. पोलीस दलातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना आतापर्यंत ३०० हून अधिक बक्षिसे तसेच ५० प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत. त्यांनी गडचिरोली, जालना, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत कार्य केले आहे.
विशेषतः संवेदनशील आणि आव्हानात्मक भागात सेवा बजावताना त्यांनी कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेला समन्वय यांचा उत्तम नमुना सादर केला आहे.आजवरच्या महाराष्ट्र पोलीस सेवेत त्यांनी अनेक संवेदनशिल गुन्हयाची उकल, तपास, दोषसिध्दी केलेली आहे. राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या य पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड ही त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची आणि सेवाभावाची पावती मानली जात आहे. सहकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले असून, पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सन्मानामुळे पोलीस दलातील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना शासनाकडून योग्य ती दखल घेतली जाते, याचे हे उदाहरण ठरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis