
सोलापूर, 02 मे (हिं.स.)।
: संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली असून, तिहेरी हत्याकांडामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गाव अक्षरशः हादरून गेले आहे. आई आणि तिच्या दोन मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरामणी गावातील मस्के कुटुंबीयांची तीन घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची १२ वीतील मुलगी प्रिया (वय १८) आणि दहावीतील मुलगा शिवराय (वय १६) हे तिघे राहत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास दिराने घराच्या गच्चीवर प्रवेश करून झोपेत असलेल्या तिघांवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवरायचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आहे. ठसे तज्ञ, गुन्हे शाखा आणि अन्य पथके तपासासाठी दाखल झाली असून पंचनामा करून मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. शेजारी सख्ख्या दिरांचे घर असल्याने शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
या भीषण घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड