“परिस्थितीची गरज म्हणून निर्णय”; बच्चू कडूंचा स्पष्टवक्तेपणा, राऊतांवर जोरदार टीका
अमरावती, 02 मे (हिं.स.) शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेशानंतर बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट भाष्य करत हा निर्णय परिस्थितीमुळे घ्यावा लागल्याचे सांगितले. “ही केवळ सोय नव्हती, तर परिस्थितीची गरज होती,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे त्
“परिस्थितीची गरज म्हणून निर्णय”; बच्चू कडूंचा स्पष्टवक्तेपणा, संजय राऊतांवर जोरदार टीका


अमरावती, 02 मे (हिं.स.)

शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेशानंतर बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट भाष्य करत हा निर्णय परिस्थितीमुळे घ्यावा लागल्याचे सांगितले. “ही केवळ सोय नव्हती, तर परिस्थितीची गरज होती,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या राजकीय निर्णयामागील कारणांबाबत स्पष्टता निर्माण झाली आहे.यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. “आम्ही काही मुंबई-दिल्लीवाल्यांचे गुलाम नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. ज्यांना ते नेते मानत होते, त्यांनाच आपण राजकारणात उभे केले, मात्र त्यांच्याकडूनच गुलाम बनवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आता स्वतंत्र भूमिका घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले.शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचा झेंडा आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह त्यांनी सन्मानपूर्वक स्वीकारल्याचे सांगितले. “ही शिवसेना सर्वांची असून सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेषतः कष्टकरी व श्रमिक वर्गाला शिवसेना आपली वाटली पाहिजे, यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.अचलपूर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना बच्चू कडू यांनी तो आपला हक्काचा मतदारसंघ असल्याचे ठामपणे सांगितले. आगामी निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार, याबाबत त्यांनी थेट संकेत देत आपल्या राजकीय उपस्थितीची जाणीव करून दिली.राजकारणातील सध्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करताना त्यांनी जात, धर्म, पंथ आणि पैशाच्या आधारावर होणाऱ्या राजकारणावर टीका केली. अशा प्रवृत्तींविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व थोर पुरुषांच्या विचारांचा सन्मान राखत पुढे जाण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande