
नांदेड, 02 मे (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, पी.पी.पी. पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एमआरआय मशीनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सुविधेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खाजगी रुग्णालयात न जाता, शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे.
या सुविधेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबीटकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील एमआरआय तपासणी सुविधेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके पाटील बोंढारकर, माजी आमदार अमर राजुकर, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले , अॅड. किशोर देशमुख इत्यादी प्रमुख लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे हा मुख्य उद्देश आहे. या नवीन MRI मशीनमुळे रुग्णांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण हे शासनाचे प्राधान्य आहे. तसेच आजपासून ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
सदर एमआरआय हे मशीन उच्च क्षमतेचे असून यामुळे मेंदू, मणका, सांधे आणि शरीरातील इतर अंतर्गत भागांचे अत्यंत अचूक निदान (Imaging) करणे शक्य होईल. खाजगी लॅबमध्ये 5 ते 10 हजार रुपये खर्च येणारी ही तपासणी जिल्हा रुग्णालयात मोफत केली जाणार असून आपत्कालीन रुग्णांसाठी ही सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. पांडुरंग पावडे, डॉ. हनुमंत जाधव, डॉ. राष्ट्रपाल अवसरे आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis