
मुंबई, 02 मे (हिं.स.) - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन करीत विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी, या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला आज फळ मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. या परीक्षेतील यशानंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. पुढील उच्च शिक्षणासाठी ज्या ज्या क्षेत्रात विद्यार्थी जातील त्या क्षेत्रात महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे. तुम्ही उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आहात, तुमच्या कर्तृत्वातून एक समृद्ध समाज घडवण्याचे स्वप्न आपण सर्व मिळून पूर्ण करूया, अशा शब्दांत मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे.
ही परीक्षा अंतिम ध्येय नसून, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे. हा निकाल विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य ठरवू शकत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जून- जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा होतील. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या विद्यार्थ्यांना दिलासाही दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी