खरीप हंगामासाठी रायगड जिल्ह्यात १४ हजार मेट्रिक टन खताचे वाटप
रायगड, 02 मे (हिं.स.)। आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले आहे. शासनाकडून रायगड जिल्ह्यासाठी एकूण १४ हजार मेट्रिक टन रासायनिक खताचे वाटप करण्यात आले असून एप्रिल २०२६ ते
Fertilizer stocks available; farmers confident for Kharif season


रायगड, 02 मे (हिं.स.)। आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले आहे. शासनाकडून रायगड जिल्ह्यासाठी एकूण १४ हजार मेट्रिक टन रासायनिक खताचे वाटप करण्यात आले असून एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने खत विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणार आहे.

खरीप हंगामात खतांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी अलिबाग तालुक्यासाठी १९०० मेट्रिक टनाचा संरक्षित साठा राखून ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार अनुदानित खते उपलब्ध राहतील आणि पेरणीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, अनुदानित युरिया खताचा शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. औद्योगिक वापरासाठी युरियाचा वापर करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्यात येत असून खताचा अनधिकृत साठा किंवा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या या नियोजनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande