
लातूर, 02 मे, (हिं.स.)। औसा तालुक्यातील किल्लारी येथे दि. २३ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या प.पू. राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या श्री राम कथा ज्ञान यज्ञाच्या भव्य मंडपाचे श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात भूमिपूजन आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ही कथा दररोज सकाळी साडेनऊ ते दुपारी दिड या वेळेत होणार आहे. कथेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचीही सोय करण्यात आली आहे.
आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते सभा मंडपाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मीरमणजी लाहोटी, ओमप्रकाश डागा , बियाणी, किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, माजी सरपंच डॉ. शंकर परसाळगे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन सोहळ्यानंतर श्री राम कथा संयोजन समितीच्या वतीने आ. पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी श्री राम कथेच्या श्रवणासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. श्री राम कथेच्या श्रवणासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे. त्याकरिता आवश्यक तो पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती आ. पवार यांनी दिली. माहेश्वरी समाजाच्या लातूर शहराध्यक्षपदी लक्ष्मीकांत सोनी यांची निवड झाल्याबद्दल यावेळी आ. पवार आणि डागा परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis