राज्याचा बारावीचा निकाल जाहीर, ८९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे, 02 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी, २ मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एक
निकाल जाहीर झाल्यावर जल्लोष करताना विद्यार्थीनी


पुणे, 02 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी, २ मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या ९१.८८ टक्क्यांच्या तुलनेत २.०९ टक्क्यांनी घट झाली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा दर ९३.१५ टक्के नोंदवण्यात आला असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के आहे.

राज्यातील ९ विभागीय मंडळांमधून एकूण १४,४४,७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खाजगी विद्यार्थ्यांमध्ये ३६,९४१ पैकी २९,६३४ विद्यार्थी (८०.२१%) उत्तीर्ण झाले, तर ५०,३४६ पुनर्परीक्षार्थींमध्ये १८,३४९ विद्यार्थी (३६.४४%) यशस्वी ठरले.

कोकण विभाग अव्वल, लातूर शेवटचा

विभागनिहाय निकालात कोकण विभागाने ९४.१४ टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे (९१.२५%) आणि अमरावती (९०.९२%) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. नाशिक (९०.७२%), मुंबई (९०.०८%), कोल्हापूर (८९.९७%), छत्रपती संभाजीनगर (८८.६८%) आणि नागपूर (८८.६७%) यांचा त्यानंतर क्रमांक लागतो. लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो राज्यात सर्वात कमी आहे.

विज्ञान शाखा आघाडीवर

शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने ९६.४४ टक्क्यांसह आघाडी घेतली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३%, कला शाखेचा ७८.०२%, व्यवसाय अभ्यासक्रम ८२.७४% आणि आयटीआय शाखेचा निकाल ८१.७८% लागला आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचीही उल्लेखनीय कामगिरी

राज्यातील ८,३६७ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ७,५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९०.५८ आहे. तसेच १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम

यंदा परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली होती. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात आला, तसेच गोपनीय पाकिटे उघडतानाचे चित्रीकरणही करण्यात आले.

गैरप्रकारांच्या एकूण १,९८३ प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी १,४६९ प्रकरणे सामूहिक कॉपीची आहेत. राज्यभरात १५ एफआयआर दाखल करण्यात आले असून १०० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि पुढील प्रक्रिया

गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी ३ मे ते १७ मे २०२६ दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. गुण पडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये, तर छायांकित प्रतीसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायांकित प्रत घेणे आवश्यक आहे.अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

नवीन गुणपत्रिका प्रणाली लागू

यावर्षी मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच ए-४ आकाराच्या कागदावर देण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे सुमारे ३ कोटी रुपयांची बचत झाली आहे. नवीन गुणपत्रिकेत क्यूआर कोड, विद्यार्थ्याचा फोटो तसेच नावाच्या क्रमातही बदल करण्यात आला आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande