
लातूर, 02 मे, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रांवर रविवार, ३ मे २०२६ रोजी नीट युजी २०२६ परीक्षा पार पडणार असून, या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी आढावा घेतला. लातूर जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रांवर सुमारे १६ हजार ३०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेवून परीक्षा केंद्रावर विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर कर्तव्य दंडाधिकारी, डॉक्टर व आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांकडे उष्माघातावरील उपचारासाठी आवश्यक औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, तसेच वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, शहरात विद्यार्थी आणि पालकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला चोख बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. या परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिल्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता टकले, गणेश पवार, सायली ठाकूर, नीट परीक्षा जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. महेंद्र गायकवाड आणि महेश सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
*जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना*
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे नीट युजी-२०२६ ही अखिल भारतीय प्रवेश परीक्षा ३ मे २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात या परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडावे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संदर्भात काही समस्या उद्भवल्यास त्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून नायब तहसीलदार पंकज मंदाडे (भ्रमणध्वनी क्र : ९६०४६०१७९५) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नियंत्रण कक्ष सहाय्यक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमले (भ्रमणध्वनी क्र : ९४०५२८१०९८) काम पाहतील. याव्यतिरिक्त आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, लातूर महानगरपालिका, महावितरण, एसटी महामंडळ आणि शिक्षण अशा विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षार्थी किंवा पालकांना काही तातडीची अडचण असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या ९३५६४०४९२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis