
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाची मोठी पाऊल; नोंदणी पूर्णतः मोफत
लातूर, 02 मे (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत महिलांना शेतीजमिनीवर समान हक्क देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे पतीच्या नावावर असलेल्या शेती जमिनीच्या 7/12 (सातबारा) उताऱ्यावर पत्नीचे नाव सहमालक म्हणून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत अधिक सक्षम करणे हा आहे. ग्रामीण भागात महिलांच्या हक्कांसाठी ही योजना मोठा बदल घडवणारी ठरत आहे.
योजनेसाठी पतीच्या नावावर शेती जमीन असणे, पती जिवंत असणे आणि पत्नीचे नाव जोडण्यासाठी पतीची संमती आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी सातबारा उतारा, आधार कार्ड, लग्नाचा पुरावा आदी कागदपत्रांची आवश्यकता असून अर्ज तलाठी किंवा महसूल कार्यालयात सादर करावा लागतो.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पत्नीला जमिनीवर कायदेशीर सहमालकी हक्क मिळतो. यामुळे जमीन विक्री, कर्ज किंवा इतर व्यवहारांमध्ये तिची संमती आवश्यक ठरते. तसेच महिलांना बँक कर्ज व सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis