
पुणे, 02 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा एकूण १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.७९ टक्के इतके नोंदविण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते.
यंदाच्या निकालात एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखेतील उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४४ टक्के इतके असून मागील काही वर्षांच्या तुलनेत थोडी घट दिसून येत आहे. २०२३ मध्ये हे प्रमाण ९०.९६ टक्के, २०२४ मध्ये ९७.८२ टक्के तर २०२५ मध्ये ९७.३५ टक्के होते.
कला शाखेत ९८.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वाणिज्य शाखेत हे प्रमाण ८७.०३ टक्के इतके नोंदविण्यात आले आहे. व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये ८२.७४ टक्के, तर आयटीआयमध्ये ८१.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एकूणच यंदाचा निकाल समाधानकारक असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत झालेली घसरण शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु