
अमरावती, 02 मे, (हिं.स.)। अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. तायडे यांनी पुन्हा एकदा कडू यांच्यावर तिखट शब्दात हल्ला चढवला आहे. बच्चू कडू यांना पैसाच प्यारा आहे. त्यांनी प्रचंड माया जमवली आहे. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे आंदोलन हे केवळ आमदारकी मिळवण्यासाठी केलेले नाटक होते. पाचव्यांदा ते निवडून आले असते, तर या ठिकाणी वाल्मिक कराड जन्माला आला असता, अशी प्रखर टीका प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचे नाव न घेता केली.
प्रवीण तायडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी रात्री परतवाडा येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना तायडे यांनी बच्चू कडू यांच्याविषयी अनेक अपशब्दही वापरले. प्रवीण तायडे म्हणाले, वीस वर्षे आमदार होतात, तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही लोकांची लाज काढता. त्याच लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते आणि त्याच लोकांनी तुमचा पराभव केला. तुम्ही लोकांना मेंढरं म्हणता. तुम्हाला पाहिजे ‘टोप्या’. आता कुठे गेल्या टोप्या. आता तुम्हाला हिंदुत्व स्वीकारावे लागणार आहे ना. आता तर ‘भगवे की शान मे अमूक अमूक मैदान मे’ असे म्हटल्याशिवाय जमणार नाही. जे म्हणत होते, आम्हाला विधान परिषद नको, आम्ही भीक मागणार नाही, आता त्यांनी तर पक्षच विलीन केला आहे.
आमदार प्रवीण तायडे म्हणाले, आता संघर्ष टोकाचा होणार आहे. आमच्याशी वाकडे वागाल तर जशास तसे उत्तर आम्ही देऊ. आयुष्यात एवढी मोठी झापड नसेल खाल्ली, तेवढी मारल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी आता सज्ज रहावे. सतर्क, सज्ज रहावे. राजकारण हे खेळीमेळीचे असले पाहिजे, ते खुनशी नसावे. इथे तर एखादा राजकारणी अपघातात जखमी होऊन पडला, तर त्याला हे उचलणारही नाहीत. इतके खालच्या स्तराचे राजकारण या मतदारसंघात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी