सरकारी शाळांमध्ये शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज - आ.डावखरे
ठाणे, 02 मे (हिं.स.)। सरकारी शाळांमध्ये लाठीकाठीसह शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज असून त्याअनुषंगाने आगामी अधिवेशनात सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे भाजपाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र दिनी झालेल्या शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराच
Shivaji-era Weapon Training


ठाणे, 02 मे (हिं.स.)। सरकारी शाळांमध्ये लाठीकाठीसह शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाची गरज असून त्याअनुषंगाने आगामी अधिवेशनात सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे भाजपाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र दिनी झालेल्या शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराच्या सांगता प्रसंगी सांगितले.

अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज यांच्या वतीने ठाण्यात दोन आठवड्याचे शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षणाचे तरुण तरुणींच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे, हे विषद करून शाळांमध्ये याचे धडे देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्यासंबंधीची केलेली सूचना उचलून धरत आमदार डावखरे यांनी आगामी अधिवेशनात शाळांमध्ये प्रशिक्षण सुरू करण्यासाठी सरकारकडे मागणी करण्याचे आश्वासित केले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ठाणे महापालिका शाळेतील सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास नगरसेवक दीपक जाधव ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख राजू मोरे व देशमुख मराठा समाजाचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव, माजी अध्यक्ष बी.पी. देशमुख, रोहिदास शिंदे, विजय खंडागळे, भालचंद्र चौधरी, रामचंद्र देशमुख, महेंद्र देशमुख, तेजेंद्र पोटे वैशाली पतंगराव, प्रशिक्षक बाळा साठे, माणिक पाटील तसेच इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांनी सादर केलेल्या साहसी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सुधाकर पतंगराव यांचे आमदार डावखरे आणि उपमहापौर पाटील यांनी अभिनंदन करीत असेच उपक्रम राबविण्याची सूचना केली.

या प्रसंगी स्वरक्षण आणि प्रशिक्षणाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले. स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता विकसित झाली, तरच समाजातील विविध आव्हानांना समर्थपणे तोंड देता येते, तसेच अशा प्रशिक्षणामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढून ती अधिक सक्षम बनते, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande