रायगड - ११ मेपासून कोलमांडलेत सामाजिक-सांस्कृतिक महोत्सव
रायगड, 02 मे, (हिं.स.)। सामाजिक कार्य, संस्कृतीचे जतन आणि युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोलमांडले पाटील मंडळी सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मे ते १५ मे दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे कोलम
Socio-cultural festival in Kolmandale from May 11


रायगड, 02 मे, (हिं.स.)। सामाजिक कार्य, संस्कृतीचे जतन आणि युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोलमांडले पाटील मंडळी सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मे ते १५ मे दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे कोलमांडले परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महोत्सवाची सुरुवात ११ मे रोजी क्रिकेट स्पर्धांनी होणार असून गावातील युवकांमध्ये याबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. १२ मे रोजी ‘कोलमांडले प्रीमियर लीग’ (KPL) स्पर्धा रंगणार असून स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धांसाठी पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.

१४ मे रोजी सामाजिक बांधिलकी जपत साईन ब्लड बँकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा तसेच आकर्षक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून बालकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्था करत आहे.

१५ मे रोजी उत्सवाचा मुख्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव तसेच स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कोलमांडले पाटील मंडळी सामाजिक संस्था, उज्वल महिला मंडळ आणि श्री बाबदेव क्रिकेट संघाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande