

रायगड, 2 मे, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू बालकांसाठी उभारलेले आरोग्यसेवेचे स्वप्न अखेर यशस्वी वास्तवात उतरले आहे. डॉ. राजेश पाचारकर मित्र फाउंडेशनच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय उपक्रमामुळे अनेक बालकांना नवसंजीवनी मिळाली असून, पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बालरोग सुपर स्पेशालिटी वैद्यकीय शिबिराला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात बाल शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, नेत्रतज्ज्ञ तसेच फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. ठाणे येथील जहरा हसनत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला.
शिबिरातून श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड तालुक्यातील आठ गरजू मुलांची पुढील उपचारांसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर फाउंडेशनच्या टीमने संबंधित गावांना भेट देत पालकांशी संवाद साधला आणि उपचारांसाठी आवश्यक नियोजन केले. ११ एप्रिल रोजी या सर्व मुलांना पनवेल येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक तपासण्या व शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. उपचारानंतर मुलांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा दिसून आली असून, पुढील फिजिओथेरपी आणि उपचारांसाठी त्यांचे नियमित फॉलोअप सुरू ठेवण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. राजेश पाचारकर यांनी स्वतः पुढाकार घेत पालक, डॉक्टर आणि रुग्णालय यांच्यात प्रभावी समन्वय साधला. मुलांना डिस्चार्ज देताना खाऊ व भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी तो प्रेरणादायी उदाहरण मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)