
- जिल्हा वकील संघात शिरीष जाखड गटाचे वर्चस्व
अमरावती, 02 मे (हिं.स.)।
जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत वकील शिरीष जाखड गटाचे प्रशांत उर्फ बबलू देशमुख यांनी प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला असून या विजयामुळे जिल्हा न्यायालय परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.
अमरावती जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी ३० एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण १३४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा कौल नोंदवला. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीत प्रशांत देशमुख यांना ६६३ मते मिळाली,तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनिल विश्वकर्मा यांना ६५६ मते पडली. साधवानी यांना २८ मतांवर समाधान मानावे लागले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत प्रशांत देशमुख यांनी ७ मतांच्या फरकाने बाजी मारत अध्यक्ष पदाला गवसणी घातली.
या संपूर्ण निवडणुकीत माजी अध्यक्ष शिरीष जाखड यांची भूमिका अत्यंत कळीची ठरली. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली जाखड गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या विजयासाठी बाळासाहेब गंधे,प्रशांत भेलांडे,सर्जेराव घुरडे,किशोर शेळके,महेंद्र तायडे,उज्वल सोनोने आणि इतर सर्व सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले. न्यायालयाच्या आवारात हा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयोत्सव साजरा केला. वकिलांच्या हितासाठी आणि संघाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांनी दिली.
निकालाने वाढवली काळजाची धडधड
अमरावती वकील संघाची ही निवडणूक खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरली. प्रत्येक फेरीनंतर उमेदवारांच्या मतांमध्ये होणारी वाढ आणि चुरस पाहता निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत अखेर जाखड गटाने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. हा विजय म्हणजे सर्वसामान्य वकिलांनी दिलेल्या विश्वासाची पोचपावती असल्याचे मत कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी