
पुणे, 02 मे, (हिं.स.)। नियम पाळले नाहीत तर स्वर कर्कश होतात, तसेच जीवनात शिस्त आणि समन्वय नसेल तर विसंवाद निर्माण होतो. घोषवादन आपल्याला निरीक्षण, समन्वय, त्याग आणि सामूहिकता शिकवणारे एक प्रभावी साधन आहे. आजच्या या सम्यक वादनातून सेविकांनी पूर्णत्वाचा ध्यास प्रकट केला असून, हे घोषवादन सज्जनशक्तीच्या आत्मविश्वासाचा हुंकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले.
राष्ट्रसेविका समितीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात आयोजित 'विजयघोष २०२६' या विशेष घोषवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विमाननगर येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. १ मे २०२६ रोजी पुणे येथे 2 तर अहिल्यानगर आणि कोल्हापूरयेथे प्रत्येकी एक अशा चार ठिकाणी एकाच वेळी, एकाच क्रमाने हे शिस्तबद्ध सादरीकरण पार पडले.
आपल्या मनोगतात शांताक्का यांनी बुद्ध पौर्णिमेचा संदर्भ देत पूर्णत्वाचा संदेश दिला. त्या म्हणाल्या की, भगवा ध्वज आणि भारत माता यांच्या चरणी समर्पण केल्यावरच राष्ट्राचा विकास योग्य दिशेने होतो. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून आपल्यातील गुण आणि क्षमता राष्ट्रार्पण करण्याची वृत्ती सेविकांनी जोपासावी. समितीच्या ९० वर्षांच्या आणि संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक शाखेने किमान ९० घरांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प करावा. 'संकल्पित कुटुंब' ‘सज्जन व्यक्तिमत्त्व’ आणि 'जागृत राष्ट्रभक्त नागरिक' हेच समर्थ भारताचे आधारस्तंभ आहेत.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी घोषाच्या शक्तीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, घोषामुळे केवळ शरीरात नव्हे तर मनातही जोश निर्माण होतो. संचलन हे मनं आणि पावलं एकत्र आणणारं माध्यम आहे. रामसेतू बांधताना खारीने जसा छोटासा वाटा उचलला, तसंच प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसारसमाजासाठी योगदान द्यावं. समाज आणि राष्ट्रासाठी सक्रिय नागरिक म्हणून काम करणं हीच खरी देशभक्ती आहे. समाजात आज मुलींवरील अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत. अशा वेळी आपण केवळ प्रेक्षक न राहता संघटित होऊन सुरक्षा आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण केले पाहिजे. प्रत्येकाने वर्षाकाठी किमान १०० महिलांपर्यंत पोहोचून जागृतीचा संकल्प करावा.
'विजयघोष' उपक्रमांतर्गत पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील २१ जिल्ह्यांमधील सेविकांनी एकाच वेळी घोषवादन सादर केले. पुण्यात सिंहगड, कात्रज, कसबा, पर्वती, येरवडा, विद्यापीठ, लष्कर, संभाजी या भागांतील सेविकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या सोहळ्यात प्रसिद्ध गायिका अपूर्वा निषाद आणि अखिल भारतीय सहघोष प्रमुख प्राची पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्राची पाटील यांनी 'स्वार्थरहित आणि ज्ञानसहित' कार्यकर्ता कसा घडतो, यावर मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या की, घोषवादनातील प्रत्येक लय आणि ताल हा जीवनातील अनुशासनाचे प्रतीक आहे. कंठस्थ झालेले राष्ट्रवादाचे विचार हृदयस्थ करण्याची हीच वेळ आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्व शाखांचे 'एकत्रित स्थिर वादन'. घोषदंडाच्या इशाऱ्यावर शेकडो सेविकांनी एकाच तालात केलेल्या हालचालींनी उपस्थितांची मने जिंकली. अहिल्यानगर येथे झालेल्या स्पर्धेत दक्षिण नगर जिल्ह्याने प्रथम, तर नाशिकने द्वितीय क्रमांक मिळविला.
गीता परिवाराच्या अंजलीताई कापडिया यांनी 'संघटित मातृशक्तीच देशाचा विकास करू शकते' असा विश्वास यावेळी व्यक्त केला. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इनामदार यांनी समितीची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडली.
त्या म्हणाल्या की, विजयघोष हा 'सेविका ते कार्यकर्ती' या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. घोषवादनासारख्या उपक्रमातून सेविकांमध्ये उपजत असलेल्या कौशल्यांचा विकास होतोच, पण त्यासोबतच शिस्त, एकाग्रता आणि संघभावना वृद्धिंगत होण्यास मदत होते.तर सुयोग कुंडलकर यांनी संगीतातील संवेदनशीलता आणि लयबद्धता जीवनात उतरवण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु