
सातारा, 02 मे, (हिं.स.)। रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, राजकीय तसेच सामाजिक अशा क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला / संस्थेला “सातारा भूषण” पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी ट्रस्टने श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्याचे योजिले आहे. रोख रु. ४०,०००/- व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या रविवारी दि . 10 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रदान केला जाणार आहे .येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत, लेखक व ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. यावेळी सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत ,शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व राज्यसभेचे खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन नितीन काका पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे .या कार्यक्रमास समस्त सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने विश्वस्त व माजी नगराध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले यांनी केले आहे.
श्रीनिवास दादासाहेब पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मारुल हवेली (ता. पाटण, या लहान गावात झाला. त्यांनी सातारा जिल्ह्याच्या आणि विशेषतः येथील ग्रामीण भागाच्या जडणघडणीत सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावर अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतीला एक नवी दिशा मिळाली. साताऱ्याची अस्मिता, गड-किल्ले आणि तिथला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. 'प्रतिसरकार'च्या चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान आणि त्यांच्या कार्याचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले. श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) असताना प्रशासनात अनेक धाडसी आणि लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यापैकी 'लोकदरबार' किंवा 'जनता दरबार' ही संकल्पना खूप गाजली.
श्रीनिवास पाटील हे भारतीय राजकारणातील एक अनुभवी आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग लोककल्याणासाठी अतिशय उत्तमरीत्या केला. आय ए एस अधिकारी ते सिक्कीमचे राज्यपाल आणि खासदार अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवलेली आहेत. त्यांच्यामुळे बऱ्याच दशकांनंतर साताऱ्याला राज्यपाल पदाचा बहुमान मिळाला.
सातारा आणि परिसरातील शिक्षण, सहकार आणि शेती क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून “सातारा भूषण” पुरस्कारासाठी ट्रस्टचे पूर्व ट्रस्टी कै.अरुणराव गोडबोले यांच्या इच्छेनुसार आत्ताच्या ट्रस्टींनी त्यांची निवड केली आहे.
ट्रस्टने यापूर्वी अनेक मान्यवरांना सदर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सदर परंपरा गेली ३५ वर्षे अखंडपणे चालू आहे.अशी माहिती ट्रस्टचे ट्रस्टी डॉ.अच्युत गोडबोले यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर