‘डाऊन्स सिंड्रोम'वर मात करत शहापूरच्या सलोनीचे बारावीत दैदीप्यमान यश
शहापूर, 2 मे, (हिं.स.)। ‘इच्छा तिथे मार्ग'' या उक्तीचा प्रत्यय शहापूरच्या सलोनी काबाडी हिने पुन्हा एकदा आणून दिला आहे. जन्मतःच ‘डाऊन्स सिंड्रोम'' आणि अल्प दृष्टी यांसारख्या आव्हानांशी झुंज देणाऱ्या सलोनीने, बारावीच्या परीक्षेत ७१ टक्के गुण मिळवू
शहापूरः


शहापूर, 2 मे, (हिं.स.)। ‘इच्छा तिथे मार्ग' या उक्तीचा प्रत्यय शहापूरच्या सलोनी काबाडी हिने पुन्हा एकदा आणून दिला आहे. जन्मतःच ‘डाऊन्स सिंड्रोम' आणि अल्प दृष्टी यांसारख्या आव्हानांशी झुंज देणाऱ्या सलोनीने, बारावीच्या परीक्षेत ७१ टक्के गुण मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वी मात केली आहे. तिची ही यशोगाथा सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे.

शहापुरात हार-तुऱ्यांचा व्यवसाय करणारे अरुण व अक्षदा काबाडी यांची सलोनी ही धाकटी मुलगी. दहावीतही उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सलोनीसमोर बारावीच्या परीक्षेदरम्यान एक मोठे संकट उभे राहिले. परीक्षेच्या अवघ्या १० दिवस आधी घरात तोल जाऊन पडल्याने तिच्या कंबरेला गंभीर दुखापत (बॉल डिसलोकेशन) झाली. मात्र, शारीरिक वेदना आणि डॉक्टरांच्या उपचारांनंतरही तिने हार न मानता व्हिलचेअरवरून परीक्षा देण्याचा धाडसी निर्णय घेतला.

दृष्टीदोष असल्याने सलोनीला वाचन करताना अडचणी येत होत्या. त्यावर तिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय शोधला. यूट्यूबवर शैक्षणिक व्हिडिओ ऐकून संकल्पना स्पष्ट केल्या. ऑनलाईन ऑडिओ नोट्‌सच्या माध्यमातून अभ्यासाची उजळणी केली. परीक्षेत ११ वीची विद्यार्थिनी कु. श्रेया दलाल हिने सलोनीसाठी ‘रायटर' म्हणून मोलाची भूमिका बजावली. सलोनीने शहापुरातील खाडे विद्यालय येथे १७ क्रमांकाचा फॉर्म भरून ही परीक्षा दिली. या प्रवासात खाडे विद्यालयातील शिक्षक, डॉ. शेलवले यांचे उपचार आणि तिच्या कुटुंबाचा खंबीर पाठिंबा तिला लाभला.

सन्मानाची थाप

सलोनीच्या या यशाची दखल घेत शहापूरच्या समृद्ध सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष संतोष देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी सलोनी आणि काबाडी दाम्पत्याचा विशेष सन्मान केला. शारीरिक व्याधी आणि अपघातावर मात करत सलोनीने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, समाजातील संकटात सापडलेल्या अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहे.

सलोनीची जिद्द आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात तिला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा बी.सी.ए. पदवी मिळवायची आहे. तिच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आम्ही सदैव सोबत आहोत.”

- काबाडी कुटुंब

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande