ठाण्याच्या गावदेवी मैदानात १० मे पर्यंत आंब्याचा दरवळ
ठाणे, 02 मे, (हिं.स.)। गेली १९ वर्ष सुरू असलेली ठाण्यातील आंबा महोत्सवाची चळवळ कौतुकास्पद आहे, या चळवळीचा एक ठाणेकर म्हणुन मला अभिमान आहे. असे कौतुकोद्गार प्रसिद्ध अभिनेते अमोघ चंदन यांनी काढले. ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्याच्या हस
*ठाण्याच्या गावदेवी मैदानात १० मे पर्यंत आंब्याचा दरवळ*


ठाणे, 02 मे, (हिं.स.)। गेली १९ वर्ष सुरू असलेली ठाण्यातील आंबा महोत्सवाची चळवळ कौतुकास्पद आहे, या चळवळीचा एक ठाणेकर म्हणुन मला अभिमान आहे. असे कौतुकोद्गार प्रसिद्ध अभिनेते अमोघ चंदन यांनी काढले. ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्याच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अभिनेते अमोघ चंदन बोलत होते.

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ मे ते १० मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, सौ.कमल संजय केळकर, कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, भाजप गटनेते मुकेश मोकाशी,नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, सुरेश कांबळे, उषा वाघ, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक सीताराम राणे, भाजप महिला आघाडी अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा, संतोष साळुंखे, कैलास म्हात्रे, सचिन केदारी, विशाल वाघ कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेते अमोघ चंदन यांनी, गेली १९ वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाच्या चळवळीचे कौतुक करून कोकणातील शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहात ही चळवळ सुरू ठेवणारे आमदार संजय केळकर हे खऱ्या अर्थाने जनसेवक असल्याचे सांगितले. सीताराम राणे यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवासाठी गा-हाणे घातले. दरम्यान, आ. निरंजन डावखरे यांनी, कोकण प्रदेशातील वृत्तपत्रांची रद्दी वापरून काही विक्रेते कोकणच्या नावाखाली आंबा विक्री करतात, तेव्हा ग्राहकांनी न फसता या आंबा महोत्सवात अस्सल हापुस आंब्याची चव चाखावी, असे आवाहन केले.

कोकणच्या शेतकऱ्यांना बळ द्या...

प्रतिकुल परिस्थिती असुनही कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात. कोणताही मध्यस्थ किंवा दलाला शिवाय अस्सल हापुस आंबा थेट ग्राहकांना मिळावा तसेच, एक प्रकारे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी गेली १९ वर्षे या आंबा महोत्सवाच्या माध्यमातुन ही चळवळ सुरू आहे. तरी, कोकणातील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी.

- आमदार संजय केळकर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande