
ठाणे, 02 मे (हिं.स.) - ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांच्या प्रसंगावधानामुळे मुंब्रा येथील एका निवासी सोसायटीतील अनेकांचे प्राण वाचले. अग्निशमन दल येण्यापूर्वीच आग लागलेल्या इमारतीत घुसून वीजप्रवाह खंडीत करण्याचे धाडस पठाण यांनी केल्याने मोठी दुर्घटना टळली.
अमृतनगर येथील एम के कंपाऊंडमध्ये असलेल्या इमारतीमधील एका घरात सिलिंडरचा पाईप फाटल्याने आग लागली. या आगीची माहिती मिळताच विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी घटनास्थळ गाठले. सिलिंडर पेट घेत असल्याने आवश्यक त्या सुचना करून घरातील किमती साहित्य बाहेर काढले. तसेच, ज्या घराला आग लागली होती. त्या घराच्या खालच्या मजल्यावरील भिंतीवर विद्युत मीटर आणि केबल्स असल्याने ही शाॅर्ट सर्कीट होऊन ही आग अधिकाधिक भडकण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास येताच शानू पठाण यांनी जीवाची पर्वा न करता आग लागलेल्या इमारतीत घुसून आधी वीजप्रवाह खंडीत केला अन् रहिवाशांना सुरक्षितस्थळी नेले. त्यानंतर आलेल्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली.
दरम्यान, याबाबत शानू पठाण म्हणाले की, हे काम सामाजिक जाणिवेतून केले आहे. त्यामुळे त्याचे क्रेडीट घेण्याची आवश्यकता नाही. आपण आपले कर्तव्य केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर