खरीप हंगामासाठी रायगडमध्ये कृषी विभागाची विशेष मोहीम
रायगड, 20 मे (हिं.स.) : खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत परवानाधारक विक्रेत्यांवर विशेष पथकांमार्फत क
Agriculture Department keeps a close eye on the sale of fertilizers and seeds


रायगड, 20 मे (हिं.स.) : खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत परवानाधारक विक्रेत्यांवर विशेष पथकांमार्फत काटेकोर लक्ष ठेवण्यात येत असून, गैरव्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात लवकरच पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी भात बियाणे आणि खतांच्या खरेदीलाही सुरुवात झाली असून, कृषी विभागाने पुरवठा यंत्रणा सक्रिय केली आहे.

रायगड जिल्ह्यात सुमारे 91,521 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. यंदा 73,000 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यास 14,000 मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मिळाले असून, आतापर्यंत 1,687 मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. टंचाई टाळण्यासाठी संरक्षित साठाही तयार केला जात आहे.

बियाण्यांच्या बाबतीत जिल्ह्यासाठी 16,950 क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली असून, आतापर्यंत 4,333 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. महाबीजसह विविध खासगी कंपन्यांकडूनही बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे.

दरम्यान, अनधिकृत साठा, जादा दराने विक्री किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण आल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande