
नाशिक, 21 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, अनावश्यक खर्च टाळणे आणि शाश्वत विकासासाठी दिलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील नासिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या कार्यकारिणी सदस्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने बैठकीस उपस्थिती लावून अनोखा आदर्श निर्माण केला.
कार्यकारिणी बैठकीसाठी अनेक सदस्यांनी दुचाकी, इलेक्ट्रिक वाहने, सार्वजनिक वाहतूक तसेच कार-पूलिंगचा वापर केला. काही सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन सहभाग नोंदवला, अशी माहिती निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी दिली.निमाने याआधीच उद्योग क्षेत्राला इंधन खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे, तसेच कर्मचारी स्तरावर सार्वजनिक वाहतूक आणि कार/बाईक-पूलिंगला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
या उपक्रमातून कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि ऊर्जा बचतीला चालना देणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. उद्योगांनी शक्य त्या ठिकाणी लॉजिस्टिक्सचे कार्यक्षम नियोजन करावे आणि अनावश्यक परदेश प्रवास टाळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ द्यावे, असेही मार्गदर्शन करण्यात आले.निमाच्या म्हणण्यानुसार, अशा उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्रात शाश्वत विकासाची संकल्पना अधिक मजबूत होत असून इतर संस्थांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV