


मुंबई, 20 मे (हिं.स.) - येथील वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे. रेल्वेकडून राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेचा आज दुसरा दिवस आहे. आज या ठिकाणी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. गरीब नगरमध्ये रेल्वेच्या जमिनीवरील बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझर कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईला विरोध केला जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ही धडक मोहीम हाती घेतली आहे. आज तोडक कारवाईवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, जमावाने पोलिसावर बाटल्या आणि दगड फेकले, यामुळे परिस्थिती चिघळली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. लाठीचार्ज केल्यामुळे जमाव अधिक आक्रमक झाला, मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. गरीब नगर परिसरात झालेल्या या कारवाईत काही पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
पश्चिम रेल्वेकडून वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर झोपडपट्टी भागात न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आज मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली. कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पश्चिम रेल्वेकडून संबंधित परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पथक दाखल झाल्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात विरोध झाला. त्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या दिशेने बाटल्या फेकल्याची घटना घडली. या प्रकारानंतर परिस्थिती अधिक चिघळत गेली आणि काही वेळातच दगडफेक सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही काही काळ परिसरात तणाव कायम राहिला. या दरम्यान दगडफेक करणाऱ्या काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेवरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत आहे. अनेक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्था याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप करत नागरिकांनी कारवाईला विरोध दर्शवला. प्रशासनाकडून मात्र ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार आणि नियमानुसारच सुरू असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील कारवाई आणि परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जागेवर उभ्या असणाऱ्या बेकायदेशीर बांधकामावर या तोडक मोहिमेअंतर्गत हातोडा पडला. 19 ते 23 मे असे पाच दिवस ही कारवाई सुरू असणार आहे. वांद्रे येथे केली जाणारी कारवाई प्रामुख्याने कार्यरत रेल्वे मार्गालगतच्या रेल्वे सुरक्षा क्षेत्रात केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी