
जळगाव, 20 मे (हिं.स.): काही दिवसांपूर्वी जळगाव शहरात बांगलादेशी तरुणाला अटक झाल्याची घटना ताजी असतानाच, आता भुसावळ शहरातही पोलिसांनी मोठी कारवाई करत एका बांगलादेशी महिलेला बेकायदेशीर वास्तव्य करताना ताब्यात घेतले आहे. तिच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 42 वर्षीय महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (रा. पीरोजपुर जिल्हा, बांगलादेश) असे असून, भारतात आल्यानंतर ती “जस्मिन बी मोहम्मद खान” या बनावट नावाने दीनदयाल नगर, भुसावळ येथे राहत होती.
प्राथमिक चौकशीत तिने 2009 मध्ये दलालामार्फत 5,000 रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ती रेल्वेने भुसावळ येथे आली आणि तेथेच स्थायिक झाली.
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, भारतात कायमस्वरूपी वास्तव्यासाठी तिने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील कागदपत्रांचा गैरवापर केला. या आधारे तिने रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार केल्याचे उघड झाले आहे.
या बनावट पासपोर्टच्या आधारे ती मे 2023 मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याची माहितीही तपासात निष्पन्न झाली आहे.
पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून, तांत्रिक विश्लेषणात IMO आणि व्हाटसऍप्पद्वारे +880 बांगलादेशी क्रमांकांशी सतत संपर्क, चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्स झाल्याचे पुरावे मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मोबाईलमध्ये तिच्या जन्मदाखल्याची प्रतही आढळून आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणारे एजंट व दलाल यांचा शोध सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर