
रायगड, 20 मे (हिं.स.) : अलिबाग तालुक्याची तहान भागविणाऱ्या उमटे धरणातील गाळ साचल्याच्या प्रश्नावर आता नागरिक आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. धरणातील गाळामुळे दूषित पाणीपुरवठा होत असून सुमारे 60 हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप उमटे धरण संघर्ष समितीने केला आहे.
“गाळ काढल्यास धरण फुटेल” अशी भीती पसरवून प्रशासन आणि काही राजकीय नेत्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप समितीचे ॲड. राकेश पाटील यांनी केला आहे.
1978-79 मध्ये उभारण्यात आलेल्या या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा आणि चौलसह सुमारे 45 गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या पाण्याची पातळी कमी झाल्याने शेवाळ, माती व गाळमिश्रित पाणी नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यामुळे उलटी, जुलाब, कावीळ आणि विषमज्वरासारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता मोहन सरोदे यांनी धरणाची पाहणी केल्यानंतर “धरण फुटण्याचा कोणताही धोका नाही” असे स्पष्ट केल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे.
उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 15 एप्रिल 2025 रोजी 8 कोटी 81 लाख रुपयांची निविदा काढली होती. मात्र ठेकेदार न मिळाल्याने हे काम रखडल्याची माहिती आहे.
सरकारकडे सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण गाळ काढण्यासाठी निधी नसतो, असा आरोप करत ॲड. राकेश पाटील यांनी प्रशासनावर टीका केली आहे. तसेच हा प्रश्न न सुटल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)