काँग्रेसची 22 मे रोजी मुंबईत महत्वाची बैठक, उमेदवारही ठरणार
पक्षाकडून ''अर्थ''पूर्ण संबंध जपणाऱ्या उमेदवाराचा शोध सुरू महायुतीकडे 251 जागा, मविआकडे 152 अमरावती, 20 मे (हिं.स.) विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच
काँग्रेसची 22 मे रोजी मुंबईत महत्वाची बैठक, उमेदवार हि ठरणार


पक्षाकडून 'अर्थ'पूर्ण संबंध जपणाऱ्या उमेदवाराचा शोध सुरू महायुतीकडे 251 जागा, मविआकडे 152

अमरावती, 20 मे (हिं.स.)

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. तर काँग्रेसने आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २२ मे रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

पक्षीय बलाबलानुसार, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार आहेत, तर काँग्रेस १२० मतदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (३३), युवा स्वाभिमान (२६), प्रहार (२१), शिंदेसेना (१८) आणि बसप (०३) या पक्षांचा समावेश असून, त्यांचे एकूण संख्याबळ २५१ वर पोहोचले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या उद्धवसेनेचे २१ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ११ सदस्य एकत्र केल्यास महाविकास आघाडीचा आकडा १५२ पर्यंत जातो. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सुमारे १०० जागांचे मोठे अंतर आहे.

भाजपमध्ये या मतदारसंघाचे यापूर्वी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे नाव आघाडीवर आहे. अलीकडेच भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचे नावही जोरदारपणे चर्चेत आले असून, महायुतीतील घटक पक्ष युवा स्वाभिमान त्यांना खंबीरपणे पाठिंबा देत आहे. याशिवाय आणखी काही नावेही चर्चेत असून, येत्या काही दिवसांत उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही. पक्षाकडून 'अर्थ'पूर्ण संबंध जपणाऱ्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच संदर्भात २२ मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत शहराध्यक्ष बबलू शेखावत, ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

हा मतदारसंघ गेल्या चार निवडणुकांपासून भाजपकडेच आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये प्रवीण पोटे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले, तर त्यापूर्वीच्या दोन निवडणुका भाजपचे तत्कालीन नेते जगदीश गुप्ता यांनी जिंकल्या होत्या. या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून मैदानात होता, परंतु सर्वाधिक मतदार संख्या असूनही हा मतदारसंघ जिंकण्यात त्यांना यश आले नाही, हे वास्तव आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande