दर्यापूर गमावण्यास चौकडीचा स्वार्थ कारणीभूत; भारसाकळेंचा देशमुख-जगतापांवर घणाघात
अमरावती, 20 मे (हिं.स.)। दर्यापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून जाण्यासाठी पक्षातील काही नेत्यांचा स्वार्थी कारभार कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप माजी आमदार सुधाकरराव भारसाकळे यांनी केला. खासदार बळवंतराव वानखेडे यांना मतदारसंघातून स्वतःच्या पत
“दर्यापूर काँग्रेसचा राहिला असता; पण चौकडीच्या स्वार्थामुळे मतदारसंघ गेला”


अमरावती, 20 मे (हिं.स.)। दर्यापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून जाण्यासाठी पक्षातील काही नेत्यांचा स्वार्थी कारभार कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप माजी आमदार सुधाकरराव भारसाकळे यांनी केला. खासदार बळवंतराव वानखेडे यांना मतदारसंघातून स्वतःच्या पत्नीला किंवा पुतण्याला उमेदवारी द्यायची होती. मात्र त्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर “आपल्याला मिळत नाही तर कुणालाच मिळू नये” या भूमिकेतून त्यांनीच मतदारसंघ सोडून दिला, असा आरोप भारसाकळे यांनी केला.

“सर्वांनी एकत्र प्रयत्न केले असते तर दर्यापूर मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहिला असता,” असे सांगताना त्यांनी जिल्हा काँग्रेसमधील तथाकथित चौकडीवरही जोरदार टीका केली. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर निशाणा साधत, “जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद, जिल्हा परिषद अध्यक्षपद, जिल्हा बँक अध्यक्षपद सर्व काही त्यांनाच पाहिजे. पदांचा हव्यास इतका वाढला आहे की इतरांना संधीच दिली जात नाही,” असा आरोप त्यांनी केला.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून स्वतःला हटवण्यात आल्याबद्दलही भारसाकळे यांनी नाराजी व्यक्त केली. “मी अध्यक्ष असताना बँकेत मजबूत बॉडी उभी केली, दर्यापूरातील उमेदवार निवडून आणले. तरीही वीरेंद्र जगताप यांना अध्यक्ष करण्यासाठी माझा राजीनामा घेतला गेला,” असे ते म्हणाले.

प्रताप अडसडांकडून पराभवानंतर मतदारसंघात फिरण्यासाठी बँकेची गाडी मिळावी, हा वीरेंद्र जगताप यांचा अट्टाहास होता, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसमधील काही नेते कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून घेतात आणि काम झाल्यावर त्यांना बाजूला सारतात, अशी खंत व्यक्त करत त्यांनी पक्ष नेतृत्वावरही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande