
रायगड, 20 मे, (हिं.स.)। “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत ई-केवायसी न झालेल्या महिलांना जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. मात्र, शासनाने असा कोणताही निर्णय घेतलेला नसून संबंधित बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.
“लाडक्या बहिणींना अखेरची संधी” या मथळ्याखाली काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे महिला विकास विभागाकडे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत महिला व बाल विकास विभागाने स्पष्टीकरण देत सांगितले की, ई-केवायसीबाबत शासनस्तरावरून अद्याप कोणतेही नवीन आदेश किंवा निर्णय जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी शासनाच्या अधिकृत माध्यमांवरच अवलंबून राहावे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित माहितीमुळे नागरिकांची दिशाभूल होत असल्याने प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)