डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शहरातील ढासळलेल्या ट्रॅफिक व्यवस्थेचे पोस्टमार्टम नागरिकांना सुरक्षित रस्ते वाहतुकीची गरज
अमरावती, 20 मे (हिं.स.)। अमरावती शहरातील दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रसारमाध्यमे, डॉक्टर्स, व्यापारी, विधीज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्
डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात  शहरातील ढासळलेल्या ट्रॅफिक व्यवस्थेचे पोस्टमार्टम नागरिकांना सुरक्षित रस्ते वाहतुकीची गरज”


अमरावती, 20 मे (हिं.स.)।

अमरावती शहरातील दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रसारमाध्यमे, डॉक्टर्स, व्यापारी, विधीज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमणांचा विळखा आणि ट्रॅफिक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.

गेल्या काही वर्षांत अमरावती शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, वाहतूक नियंत्रणासाठी आजही पारंपरिक आणि विस्कळीत पद्धतींचाच वापर होत असल्याने शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. मुख्य चौकांमध्ये स्वयंचलित सिग्नल व्यवस्था असतानाही तेथे ट्रॅफिक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने वाहनचालक सिग्नल तोडून बेदरकारपणे वाहने चालवत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

या चर्चेदरम्यान शहरातील बाजारपेठांमधील अतिक्रमणे, उड्डाणपुलाखालील घुमंतूंचे वास्तव्य, रस्त्यांवर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या हातगाड्या व हॉकर्समुळे पादचारी आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली. कठोरा नाका, शेगाव नाका, गाडगेनगर, पंचवटी चौक, जयस्तंभ चौक, अंबादेवी चौक, इतवारा बाजार, नवाथे चौक, प्रभात चौक, जवाहर रोड यांसारख्या प्रमुख भागांत सातत्याने वाहतूक कोंडी होत असतानाही ट्रॅफिक पोलिस दिसत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

शिष्टमंडळाने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चौकांमध्ये आवश्यकतेच्या ठिकाणी पोलिस नसतात, मात्र सुनसान रस्त्यांवर वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांचे घोळके दिसतात, असा आरोप करण्यात आला. तसेच वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकारी कार्यालयातच बसून राहतात व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत नसल्याचेही सांगण्यात आले.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना, सिग्नलवरील लेन शिस्त, ट्रिपल सीट, विना नंबर प्लेट वाहने आणि बेफाम वेगावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. “घरातून बाहेर पडलेला नागरिक सुखरूप परत येईल की नाही, याची चिंता कुटुंबीयांना सतावत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे,” अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

या शिष्टमंडळात दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलासदादा मराठे, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, वरिष्ठ अधिवक्ता के. एस. देशपांडे, ईएनटी तज्ज्ञ डॉ. बबन बेलसरे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजय डफळे, डॉ. अनिल रोहनकर, अॅड. बंधू खोरगडे व अतुल गायगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी स्वतः भर उन्हात रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande