ड्रोन सर्वेक्षणातून उघड होणार करबुडव्या मिळकती; ९० मिळकतींतूनच ७५ कोटींची शक्यता
पुणे, 20 मे (हिं.स.)। पुणे शहरात चार लाखांहून अधिक मिळकतींवर कर आकारणीच झालेली नसल्याने पुणे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वापरात बदल करूनही अनेक मिळकतींची नोंद न झाल्याने महसुलात मोठी
drone


पुणे, 20 मे (हिं.स.)।

पुणे शहरात चार लाखांहून अधिक मिळकतींवर कर आकारणीच झालेली नसल्याने पुणे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वापरात बदल करूनही अनेक मिळकतींची नोंद न झाल्याने महसुलात मोठी तूट निर्माण होत आहे. अशा करबुडव्या मिळकती शोधण्यासाठी महाप्रित संस्थेच्या थ्रीडी ट्विन ड्रोन सर्वेक्षणाचा पर्याय प्रभावी ठरू शकतो, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात केवळ ९० मिळकतींमधूनच सुमारे ७५ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, असे स्पष्ट झाले आहे. मात्र या सर्वेक्षणासाठी महाप्रित संस्थेने मागितलेल्या मोबदल्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने हा प्रस्ताव रखडल्याची माहिती समोर आली आहे.पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर निवासी आणि व्यावसायिक बांधकामे होत असली, तरी त्यानुसार नवीन मिळकतकर आकारणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विकसक किंवा मिळकतधारकाने कर आकारणीसाठी अर्ज करणे अपेक्षित असते. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणी करून कर निश्चित केला जातो. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असून त्यात पारदर्शकतेचा अभाव असल्याने अनेक मिळकती करजाळ्याबाहेर राहत आहेत.

महापालिकेच्या माहितीनुसार शहरातील सुमारे चार लाख मिळकतींची नोंदच झालेली नाही. या मिळकती करजाळ्यात आणल्यास महापालिकेला तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande