
नांदेड, 20 मे (हिं.स.)।
नायगाव शहरात गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईने उग्र रूप धारण केले, प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळलेल्या नागरिकांनी हेडगेवार चौकात भर उन्हात महामार्गावर रास्तारोको केला. रिकामे सिलिंडर रस्त्यावर ठेवून दिल्याने वाहतूक ठप्प झाली व काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
'मेसेज येतो, गॅस येत नाही'
नायगाव येथील गॅस एजन्सीच्या विरोधात नागरिकांचा मोठा आक्रोश आहे. अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर सिलिंडर 'डिलिव्हर' झाल्याचे मेसेज येत आहेत, मात्र प्रत्यक्षात महिनाभरापासून सिलिंडर मिळाले नसल्याचा गंभीर आरोप ग्राहकांनी केला. मोबाईलवर मेसेज येतो, पण
गॅस नाही, अशा शब्दांत महिलांनी संताप व्यक्त केला. रात्रभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत पाठवले जात
असल्याने नागरिकांचा संयम सुटला. एजन्सीचे मालक किंवा व्यवस्थापक संवाद साधण्यास तयार नसल्याचा
आरोपही आंदोलकांनी केला.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस एजन्सी चालक व सेल्स ऑफिसर्स यांची बैठक झाली होती. ग्राहकांना गॅस सिलिंडर केवळ घरपोच पद्धतीने द्यावे, एजन्सीवर गर्दी होऊ नये, ग्राहकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी कडक निर्देश देण्यात आले होते. मात्र नायगाव येथील इंडेन गॅस एजन्सीकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis