नांदेड-विळेगाव थडी येथे राज्यस्तरीय सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन
नांदेड, 20 मे (हिं.स.)धर्माबाद तालुक्यातील विळेगाव थडी येथील गोदावरी नदीच्या पवित्र तटावर वसलेल्या बळी महादेव मंदिर येथे अधिकमासानिमित्त राज्यस्तरीय सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती सप्ताहाचे प्रसिद्धी प्र
नांदेड-विळेगाव थडी येथे राज्यस्तरीय सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन


नांदेड, 20 मे (हिं.स.)धर्माबाद तालुक्यातील विळेगाव थडी येथील गोदावरी नदीच्या पवित्र तटावर वसलेल्या बळी महादेव मंदिर येथे अधिकमासानिमित्त राज्यस्तरीय सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती सप्ताहाचे प्रसिद्धी प्रमुख शिवराज पाटील गाडीवान यांनी दिली.

सन १९८० मध्ये राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी याच गोदावरी काठी तपोअनुष्ठान करून अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात केली होती. मागील ५१ वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये अधिकमासानिमित्त राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी अनुष्ठान व शिवनाम सप्ताहांचे आयोजन केले होते. त्यांच्या पश्चात समग्र विश्वाच्या कल्याणासाठी व मानवजातीच्या उत्कर्षासाठी या अखंड शिवनाम सोहळ्याची परंपरा अखंड सुरू ठेवण्यात आली आहे.

याच परंपरेचा भाग म्हणून यावर्षी धर्माबाद तालुक्यातील विळेगाव थडी येथे हा भव्य दिव्य आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यांच्या सीमेलगत असलेल्या या पवित्र गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रात सप्ताहानिमित्त दररोज हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या निवास, भोजन व राहण्याची सर्व व्यवस्था ग्रामस्थ व अखंड शिवनाम सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील विविध विचारवंत, शिवाचार्य, संत-महंत व धर्मप्रेमी सहभागी होणार असून सात दिवस अध्यात्म, प्रबोधन व शिवभक्तीचा जागर घडणार आहे.

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे उत्तराधिकारी राजशेखर शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सात दिवसांचा सोहळा पार पडणार आहे. दररोज सकाळी शिवपाठ, पाच हजार एक शिवभक्तांचे सामूहिक श्री ग्रंथराज परमरस्य पारायण, त्यानंतर प्रवचन व धर्मसभा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी शिवपाठ, शिवजागर, कीर्तन, भजन तसेच विविध विचारवंतांचे वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम होणार आहेत.

या भव्य दिव्य आध्यात्मिक सोहळ्यास राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याने विळेगाव थडी परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. या अद्वितीय शिवनाम सप्ताहास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा, असे आवाहन अखंड शिवनाम सप्ताह समिती विळेगाव थडी व राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताहाचे प्रसिद्धी प्रमुख शिवराज पाटील गाडीवान यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande