
रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेतर्फे महारेरा तरतुदी या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डब्लूआयआरसी सदस्य सीए मंगेश घाणेकर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्युटिव्ह येथे हा माहितीपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांनी उद्घाटनपर भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व आणि महारेरा कायद्याची सद्यःस्थितीत असलेली उपयुक्तता विशद केली.
या सत्रात प्रमुख वक्ते आणि डब्लूआयआरसी सदस्य सीए मंगेश घाणेकर यांनी मार्गदर्शन केले. सीए घाणेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात रेराअंतर्गत भराव्या लागणाऱ्या विविध फॉर्म्सची सविस्तर माहिती दिली. दैनंदिन कामकाजात आणि या कायद्याची अंमलबजावणी करताना सीए आणि विकसकांना येणाऱ्या व्यावहारिक अडचणींवर त्यांनी प्रकाश टाकला व त्यावरील योग्य उपाययोजनांवर सखोल चर्चा केली.
विकसक, घरखरेदीदार आणि संबंधित सर्व घटकांसाठी महारेरा कायद्याचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले. या कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आलेली पारदर्शकता आणि त्यामुळे ग्राहकांच्या वाढलेल्या विश्वासावरही त्यांनी विशेष भर दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी