नांदेडमधील वन्नाळी गावात अनेक विजेचे खांब कोसळण्याच्या मार्गावर
नांदेड, 20 मे (हिं.स.)देगलूर तालुक्यातील वन्नाळी गावामध्ये महावितरणचा जीवघेणा कारभार समोर आला आहे. गावात प्रवेश केल्यापासून ते थेट गावातील तलावापर्यंत एक नव्हे, तर अनेक विजेचे खांब (लाईट पोल) अत्यंत जीर्ण होऊन मोडकळीस आले आहेत. हे खांब कधीही कोसळू
नांदेडमधील वन्नाळी गावात अनेक विजेचे खांब कोसळण्याच्या मार्गावर


नांदेड, 20 मे (हिं.स.)देगलूर तालुक्यातील वन्नाळी गावामध्ये महावितरणचा जीवघेणा कारभार समोर आला आहे. गावात प्रवेश केल्यापासून ते थेट गावातील तलावापर्यंत एक नव्हे, तर अनेक विजेचे खांब (लाईट पोल) अत्यंत जीर्ण होऊन मोडकळीस आले आहेत. हे खांब कधीही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची स्पष्ट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या देगलूर कार्यालयाने पूर्णपणे पाठ फिरवली असून, प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

महिना उलटला तरी प्रशासनाला जाग नाही

या जीवघेण्या समस्येबाबत वन्नाळी येथील नागरिक व्यंकट शंकरराव घंटेवाड यांनी देगलूर येथील शाखा अभियंत्यांना अधिकृत लेखी निवेदन दिले होते. या निवेदनावर महावितरण कार्यालयाची स्वाक्षरी आणि शिक्काही आहे. परंतु आज महिना उलटून गेला, तरीही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या खांबांची साधी पाहणी करण्याची तसदी देखील घेतलेली नाही. एका खांबाची तक्रार केली असताना, प्रत्यक्षात गावातील अनेक खांबांची अवस्था दयनीय झाली आहे, तरीही प्रशासन सुस्त बसून आहे.

पावसाळ्यापूर्वी मोठ्या दुर्घटनेची भीती, नागरिक जीव मुठीत धरून

हे सर्व खांब गावातील मुख्य रस्ता, बसस्थानक परिसर आणि रहिवासी भागात आहेत. येथून रोज शाळकरी मुले, शेतकरी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेक खांब एका बाजूला झुकले असून त्यांच्या सिमेंटचे पापुद्रे निघाले आहेत, तर काहींच्या आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने किरकोळ वादळ किंवा पाऊस झाल्यास हे अनेक खांब एकाच वेळी पत्त्यासारखे कोसळू शकतात. यामुळे केवळ जीवितहानीच होणार नाही, तर संपूर्ण गावाची वीज व्यवस्था कोलमडून पडेल.

जर हे खांब पडून गावात काही जीवितहानी किंवा अनर्थ घडल्यास, त्याची संपूर्ण कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी ही महावितरणच्या देगलूर कार्यालयाची राहील, असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande