पुणे - आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर यंत्रणा जागी; कमला नेहरू रुग्णालयाला नोटीस
पुणे, 20 मे (हिं.स.) -कमला नेहरू रुग्णालय परिसरात चार दिवस साचून राहिलेला कचरा हा जैववैद्यकीय कचऱ्याचाच असल्याचे स्पष्ट झाले असून, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण न करता जैववैद्यकीय व इतर कचरा एकत्र ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी
पुणे - आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर यंत्रणा जागी; कमला नेहरू रुग्णालयाला नोटीस


पुणे, 20 मे (हिं.स.) -कमला नेहरू रुग्णालय परिसरात चार दिवस साचून राहिलेला कचरा हा जैववैद्यकीय कचऱ्याचाच असल्याचे स्पष्ट झाले असून, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण न करता जैववैद्यकीय व इतर कचरा एकत्र ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कचरा व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या ‘श्री एंटरप्रायजेस’ या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.

रुग्णालयातील कचरा उचलण्यासाठी सलग चार दिवस गाडी न आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. वैद्यकीय कचऱ्यासोबत ओला कचरा साचल्याने नागरिक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुक्तांच्या निर्देशानंतर कचरा उचलण्यासाठी गाडी पाठविण्यात आली.

दरम्यान, कचरा उचलताना त्यात जैववैद्यकीय कचऱ्याचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले. वापरलेले डायपर, रक्ताचे डाग असलेले कपडे तसेच रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेला अन्य वैद्यकीय कचरा आढळून आला. हा प्रकार घनकचरा व्यवस्थापन नियम आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने केलेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाला कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून स्वतंत्रपणे संकलन व विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः जैववैद्यकीय कचरा स्वतंत्र पद्धतीने हाताळण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande