महानुभाव पंथाचे ज्येष्ठ संत श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांचे निधन
निफाड, 20 मे (हिं.स.) : दक्षिण महाराष्ट्रातील प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख आचार्य प्रवर महंत परमपूज्य श्री सुकेणेकर बाबा शास्त्री (वय 83) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झा
Mahant Sukenekar Baba


निफाड, 20 मे (हिं.स.) : दक्षिण महाराष्ट्रातील प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे सुकेणे (ता. निफाड) येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख आचार्य प्रवर महंत परमपूज्य श्री सुकेणेकर बाबा शास्त्री (वय 83) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने महानुभाव पंथीयांमध्ये तसेच परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर गुरुवारी (दि. 21) सकाळी 9 वाजता मौजे सुकेणे येथील महानुभाव पंथीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूळ नाव मनोहर अपसुंदे असलेले श्री सुकेणेकर बाबा शास्त्री यांचा जन्म रासेगाव (ता. दिंडोरी) येथे झाला होता. लहान वयातच त्यांनी मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात महानुभाव पंथाची दीक्षा स्वीकारून आयुष्यभर पंथाच्या आचार-विचारांचा प्रसार केला.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ते गेल्या 15 वर्षांपासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच दहा वर्षांपूर्वी त्यांच्या गुरु महंत मोठे बाबा सुकेणेकर यांच्या निधनानंतर त्यांना “महंत सुकेणेकर” ही पदवी प्राप्त झाली आणि ते श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख म्हणून विराजमान झाले.

प्रवासादरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची तब्येत खालावत असल्याची माहिती मिळते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी श्री दत्त मंदिराला शासनाच्या क वर्ग तीर्थक्षेत्रातून ब वर्गामध्ये दर्जा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

त्यांच्या निधनाबद्दल माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ता गायकवाड, प्रकाश नन्नावरे, तसेच मविप्रचे उपसभापती डी. बी. मोगल यांनी शोक व्यक्त केला असून, हे महानुभाव पंथासाठी मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande