नागपूर जिल्हा ऊर्जा क्षेत्रात होणार ‘हायटेक’
महावितरणच्या 322 कोटींच्या विकासकामांना वेग नागपूर, 20 मे (हिं.स.) : महावितरणने नागपूर जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि विनाखंड करण्यासाठी विकासकामांचा धडाका लावला असून, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण
संग्रहित लोगो


महावितरणच्या 322 कोटींच्या विकासकामांना वेग

नागपूर, 20 मे (हिं.स.) : महावितरणने नागपूर जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि विनाखंड करण्यासाठी विकासकामांचा धडाका लावला असून, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, कोट्यवधी रुपयांच्या कामांमुळे नागपूरचा वीजपुरवठा अधिक आधुनिक आणि सुरक्षित होणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील वीज वितरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महावितरणकडून सध्या 322 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा राबविण्यात येत आहे. त्यापैकी तब्बल 316 कोटी रुपयांची म्हणजेच सुमारे 98 टक्के कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली आहे. सिडबी (SIDBI CDF) आणि विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ही कामे केली जात आहेत.

विशेषतः नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागात ओव्हरहेड वीज तारांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्याचे 46 कोटी रुपयांचे काम पूर्णत्वास गेले आहे. या प्रकल्पामुळे तांत्रिक बिघाड, वादळी पावसामुळे होणारे अपघात आणि वीजपुरवठ्यातील अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत नवीन उपकेंद्रांची उभारणी, अतिरिक्त रोहित्रांची स्थापना आणि क्षमतेत वाढ यावर भर देण्यात येत आहे. काटोल, उमरेड आणि सावनेर भागातील अनेक उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच काटोलमधील डोरली आणि सावनेर एमआयडीसी येथे नवीन 33/11 केव्ही उपकेंद्रांची कामे प्रगतीपथावर आहेत.

शहरी भागातील वीज यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी महाल, बुटीबोरी आणि सिव्हिल लाईन्स विभागात नवीन उपकेंद्रांची उभारणी केली जात आहे. श्रीकृष्ण नगर, मानेवाडा आणि बेसा येथील उपकेंद्रे सुरू करण्यात आली असून, मानकापूर येथील प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

आरडीएसएस योजनेअंतर्गत वीज हानी कमी करण्यासाठी 482 नवीन वितरण रोहित्रे (एचव्हीडीएस) बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 440 रोहित्रे यशस्वीरित्या बसवण्यात आली असून, ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

याशिवाय, वीज वाहिनी विलगीकरण योजनेसाठी 356.81 कोटी रुपयांची कामे सुरू असून, 205 वाहिन्यांचे विलगीकरण आणि 1,599 नवीन रोहित्रे बसवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या कामांमुळे औद्योगिक क्षेत्राला, विशेषतः बुटीबोरी एमआयडीसीला अखंड वीजपुरवठा मिळण्यास मदत होत आहे.

महावितरणच्या या वेगवान आणि नियोजित विकासकामांमुळे नागपूर जिल्हा ऊर्जा क्षेत्रात ‘हायटेक’ बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, ग्राहकांचा त्रास कमी होण्यासोबतच औद्योगिक, कृषी आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande